लेखकाच्या परवानगीशिवाय कोणताही लेख/ भाग प्रकाशित करू नये. सर्व हक्क राखीव @ अर्थ मराठी.कॉम

भाग ५

Dr.Marco & Imran working inside of Cave
जॉर्डन आणि डॉ.एरिक यांच्या अथक परिश्रमानंतर देखील ती महामानवी कवटी तेथून बाहेर निघत नव्हती.

"इथे ऊर्जा वाया घालवण्यात काही अर्थ नाही. आपल्याला आणखी माणसांची मदत घ्यावी लागेल." जॉर्डन मातीने माखलेले हात झटकत म्हणतात, "मिडियाला फोन करून बोलवूया." असं म्हणत तो मिडीयाला फोन लावतो. अँजेलिना त्यांना मध्येच अडवते.

"काय झाल? फोन लावतोय मी." जॉर्डन विचारतात.

"सर, इतक्यात मिडियाला बोलावणं योग्य नाही. आता तर आपण सुरुवात केली आहे. माहित नाही पुढे काय वाढून ठेवलं असेल. एका ठराविक निष्कर्षावर पोहोचल्याशिवाय आपण या गोष्टी उघड करु शकत नाही." अँजेलिना म्हणते.

"आपल्याला प्राचीन लिपी मिळाली आहे, मानवी वास्तव्याचे पुरावे मिळाले आहेत. हेच काय तर प्रचंड मोठ्या आकाराची मानवी कवटी सापडली आहे. अजून कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचायचं आहे?" जॉर्डन जरा खेसकतच तिला विचारतो.

"सॉरी सर, पण आपण गुप्त मोहिमेवर आहोत. बाहेर जर या मोहिमेबद्दल समजलं तर..."

अँजेलिनाला मध्येच अडवत जॉर्डन म्हणतो, "बाहेर जर या मोहिमेबद्दल समजलं तर एक नविन शोध लावला म्हणून आपलं नाव होईल. गेली ३५ वर्षे मी या क्षणाची वाट पाहतोय, ही संधी मी सोडणार नाही. आणि कुठली गोष्ट कधी आणि कुणाला सांगायची हे मी ठरवेन."

जॉर्डनच्या डोळ्यात लोभ दिसत होता. कुणाचही काही न ऐकता तो मिडियाला फोन लावतो. जॉर्डनची ही सवय सगळ्यांना माहीत असते. तो सगळ्यांपेक्षा जास्त अनुभवी असल्याने देखील कुणी काही बोलत नाही. जोर्डनचं संपूर्ण आयुष्य मानवी पूर्वजांच्या शोधात गेलं होतं. त्याने युरोप, कॅनेडा, आफ्रिका आणि उत्तर आशिया खंडात अनेक शोध लावले होते. पुरातत्त्व विभागात त्याचं मोठं नाव होतं आणि म्हणूनच भारत सरकारने ही जबाबदारी जोर्डनवर सोपवली होती.

गुहेमध्ये अंधार असल्याने आणि ऑक्सिजनची कमतरता असल्याने सगळे तिथून बाहेर निघतात. अँजेलिनाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असतं. ती कसल्यातरी विचारात असते. डॉ एरिक अँजेलिनाला काही विचारणार इतक्यात जॉर्डन आतमधून धावतच बाहेर येतो. डॉ.अभिजीत त्याला काय झालं म्हणून विचारतो तेव्हा दिर्घ श्वास घेत जॉर्डन म्हणतो,


"तिथे आतमध्ये मिडियाबरोबर बोलत असताना मी त्या कवटीकडे पहिलं तर ती कवटी जागेवर नव्हती. इकडेतिकडे बघितलं तरी काही दिसलं नाही आणि मला कसलातरी आवाज आला. खुप विचित्र आवाज होता तो." भराभर बोलून जॉर्डन एकदम गप्प बसतो.

"इतकी मोठी मानवी कवटी अचानक कुठे जाणार?" असं बोलून इम्रान डॉ. अभिजीत आणि डॉ. एरिक यांच्यासह आत जातो.

अंधारात सगळीकडे पाहिल्यावर त्यांना हाती काही लागत नाही. ज्या ठिकाणी ती अतीप्रचंड कवटी होती त्या ठिकाणी एक मोठी पोकळ होती. डॉ. अभिजीत त्या पोकळीमध्ये जातो. त्याच्याही आत अंधुक प्रकाशात त्याला एक मंच दिसतो. सोबत असलेला टॉर्च घेऊन तो समोरील मंच स्पष्टपणे बघण्याचा प्रयत्न करतो. बाहेरुन इम्रान आवाज देतो.
Abhijeet going into Cave
"डॉक्टर, आत सगळं ठीक आहे ना! की आम्ही सुद्धा आत येऊ?"

आतमधून आवाज येतो, "हो, आत सगळं ठीक आहे. काळजी करण्यासारखं काही नाहीये."

मंचावर अभिजीतला एक आकृती दिसते. तो त्या आकृतीजवळ जातो तोच तिथे त्या आकृतीवर काही चित्र उमटतात. त्या आकृतीला स्पर्श करताच जमीन हलते आणि तिथे भूकंपाचा सौम्य धक्का बसतो.

"डॉक्टर, लवकर बाहेर या. काहीतरी विपरीत घडणार आहे." बाहेरून इम्रान ओरडतो.

"हो... हो..." म्हणत अभिजीत बाहेर निघू लागतो. भूकंपात ती आकृती नष्ट होण्यापेक्षा आपण ती सोबत घेतलेली बरी असं स्वतःशी म्हणत अभिजीत ती आकृती तिथून बाहेर काढतो आणि जमीन हलू लागते. गुहेच्या वरची माती खाली पडू लागते. हळू हळू मोठमोठाले दगड खाली पडू लागतात. ती आकृती सोबत घेऊन अभिजीत इम्रान आणि डॉ. एरिक यांच्याबरोबर धावत बाहेर जातो. गुहेच्या बाहेरुन डॉ. मार्को आणि अँजेलिना त्यांना मोठ्याने आवाज देत होते. सगळे बाहेर निघतात आणि मोकळ्या जागेवर जाऊन उभे राहतात. जमिनीला अनेक ठिकाणी भेगा पडतात. जवळपास डोंगर नसल्याने त्यांना बर्फ पडण्याची भीती नव्हती. पण जे झालं ते खूप भयानक होतं. ज्या जागी त्यांना पुरावे मिळाले होते, ती जागा जमिनीखाली गाडली गेली होती. काही क्षणाच्या विध्वंसानंतर अचानक सगळं शांत होतं आणि जॉर्डनचा मोबाईल वाजू लागतो.

"हॅलो?"

"सर मी न्यूज सर्च चॅनेल मधून बोलतोय. आपण मला थोड्या वेळापूर्वी फोन केला होता."

जॉर्डन भूकंपाच्या धक्क्यातून सावरला नव्हता आणि फोनवर नक्की काय बोलवं हे देखील त्याला सुचत नव्हतं.

"माफ़ करा, मला चुकीची माहिती मिळाली होती."

"चुकीची तर चुकीची. पण नक्की काय माहिती मिळाली होती?"

"हिमालयामध्ये ८६ रोडजवळ भूकंप झाला आहे आणि माफ़ करा, पण सध्या मी बोलण्याच्या स्थितीत नाहिये" एवढं बोलून जॉर्डन फोन ठेवतो आणि अँजेलिनाकड़े बघतो.

"माझ्याकडे बघुन काही होणार नाही. इथे इंचार्ज तुम्ही आहात. तुम्ही जसं सांगाल तसंच आम्ही करु."

"नाही. तू माझ्यापासून काही लपवत आहेस. हे सर्व होणार याची तुला पूर्ण कल्पना होती."

"नाही... खरंच मला याची कसलीही कल्पना नव्हती. तसं असतं तर मी डॉ. एरिक, डॉ. अभिजीत आणि इम्रानला आत जाऊ दिलं नसतं"

"बरं, तू संगीतलस आणि मी ऐकलं... आता खरं काय ते सांग..." जॉर्डन अँजेलिनाकड़े रोखून बघतात.

"गप्प बसा तुम्ही दोघे आणि हे बघा." अभिजीत त्यांना ती आकृती दाखवतो. त्या आकृतीचा आकार बदललेला असतो. तिने विचित्र आकार घेतला होता.

"हे काय आहे?" डॉ. मार्को विचारतात.

"हेच ते आहे ज्याला हात लावल्यावर भूकंप झाला होता." अभिजीत म्हणाला.

"म्हणजे?" मार्को

"आत ज्या ठिकाणी ती कवटी होती, त्या ठिकाणी एक पोकळ तयार झाली होती. त्या पोकळीमध्ये गेल्यावर मला एक मंच दिसला. जसं की खूप मोठ्या पर्वतावर मी उभा आहे आणि तिथे कुणीतरी एखाद्याला बंदिस्त केलं आहे. त्याची चौकशी सुरु आहे आणि तो समोरच्याला उत्तर देत आहे. तो काहीतरी सांगत होता पण मला त्याची भाषा काळात नव्हती. नंतर अचानक तिथे सगळं अदृश्य झालं आणि एक आकृती तयार झाली. अंधारात सुद्धा ती स्पष्टपणे दिसत होती." अभिजित.

"हे असंच दिसत होतं का?" अँजेलिना म्हणते.

"नाही. तेव्हा त्याचा आकार एखाद्या ज्वालामुखीसारखा दिसत होता." अभिजीत म्हणतो.

"आणि आता हा आकार सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला काहीतरी सुचवतोय." डॉ. एरिक म्हणतात.

"जोपर्यंत पूर्ण खुलासा होत नाही, तोपर्यंत ही गोष्ट बाहेर कुणालाही कळता कामा नये." जॉर्डन मध्येच म्हणतो.
(क्रमशः)

No comments:

Post a Comment