लेखकाच्या परवानगीशिवाय कोणताही लेख/ भाग प्रकाशित करू नये. सर्व हक्क राखीव @ अर्थ मराठी.कॉम

भाग ७

Unxpected Volcano which Dr.Abhijeet got from the Cave
त्या अज्ञात गुहेतून मिळालेल्या सुगाव्यांचा शोध घेत जॉर्डन आणि त्याची टीम तिथेच जवळ एका पडलेल्या झाडाजवळ बसून सक्रीय होते. इम्रान डॉ.अभिजीतला मिळालेल्या आकृतीचं स्केच काढण्यात व्यस्त असतो. डॉ.अभिजीत आणि जॉर्डन मिळालेल्या सुगाव्यांची फेरतपासणी करत असतात. डॉ.मार्को जॉर्डनची मदत करायला येतात तेव्हा डॉ.अभिजीत आणि डॉ.एरिक हातावर उमटलेल्या भाषेची पडताळणी करण्याचा प्रयत्न करतात. अँजेलिना घडलेल्या सर्व प्रकारांमधून निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करते. जॉर्डनच्या समूहाने अनेक शोध लावले होते, अनेक ठिकाणी त्यांना असंख्य अडचणी आल्या होत्या. पण, हा अनुभव त्यांच्यासाठी खूपच वेगळा होता. निष्कर्ष काढत असताना अँजेलिना डॉ.अभिजीतला बोलावते.

"बोला, काय मदत करू?" अभिजीत म्हणतो.

"गुहेमध्ये तुम्हाला नक्की काय दिसलं होतं?" अँजेलिना म्हणते.

"हेच की, ज्या ठिकाणी ती कवटी होती, त्या ठिकाणी एक पोकळ तयार झाली होती. त्या पोकळीमध्ये गेल्यावर मला एक मंच दिसला. जसं की खूप मोठ्या पर्वतावर मी उभा आहे आणि तिथे कुणीतरी एखाद्याला बंदिस्त केलं आहे. त्याची चौकशी सुरु आहे आणि तो समोरच्याला उत्तर देत आहे. तो काहीतरी सांगत होता पण मला त्याची भाषा काळात नव्हती. नंतर अचानक तिथे सगळं अदृश्य झालं आणि एक आकृती तयार झाली. अंधारात सुद्धा ती स्पष्टपणे दिसत होती." अभिजित म्हणाला.

"तो बंदिस्त माणूस नक्की कसा दिसत होता? काही वर्णन करू शकाल?" अँजेलिना विचारते.

"हो. तो बंदिस्त माणूस माझ्या डोळ्यासमोरून जाऊ शकत नाही. त्या माणसाला आपल्यासारखेच हात पण त्यांना फक्त चारच बोटं होती, त्याच्या पायाचे तळवे रुंद होते, त्याला लिंग नव्हते, रंगाने हिरवानिळा असणारा तो पशु बऱ्यापैकी मनुष्य प्राण्यासारखा दिसत होता. मात्र त्याचं तोंड सापासारखं होतं. असा विद्रुप आणि भयानक पशू मी स्वप्नात देखील पहिला नव्हता. त्याच अर्ध शरीर माणसाचं आणि अर्ध शरीर सापाचं होतं." डॉ.अभिजीत बोलतच होता.

"म्हणजे आपल्याला तो सांगाडा मिळाला तो याच माणसाचा असावा." जॉर्डन उत्स्फुर्तपणे म्हणतो.

"आणि तो चौकशी करणारा माणूस कसा दिसत होता?" डॉ.एरिकने विचारलं.

Rudraswami in Past
"साधारण ८०-९० वर्षांचे वयस्कर होते कुणीतरी. पण तरीही ते ताठ उभे होते. छातीपर्यंत लांब असलेली सफेद दाढी आणि तितकेच लांब केस, साडेसात ते आठ फुट उंच असलेले ते खूप तेजस्वी दिसत होते. त्यांनी सफेद रंगाचा पेहराव घातला होता. खूप विचित्र भाषा होती त्यांची, मला काहीच समजत नव्हतं. मी अगदी स्तब्धपणे उभा होतो. असं वाटत होतं, एखाद्या ऐतिहासिक घटनेचा मी साक्षीदार होत आहे. मी त्या सापाकडे निरखून बघतच होतो कि त्या वृध्द माणसाने त्या सापासारख्या दिसणाऱ्या माणसाचं मुंडकं त्याच्या शरीरापासून वेगळं केलं. त्याच्या जवळ गेलो तर भूकंप आणि ती आकृती..." डॉ.अभिजीत अँजेलिनाकडे बघू लागला.

"याचा अर्थ माझा अंदाज योग्य आहे, ही आकृती आपल्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मोठ्या कवटीचं आपल्याला दिसणं आणि नंतर ते अचानक अदृश्य होणं म्हणजे आपल्यापैकी कुणीतरी तिथे जाऊन ते रहस्य समजून घ्यावं यासाठी तो एक आभास निर्माण केला होता." अँजेलिना म्हणते.

"आभास?" जॉर्डन विचारतो.

"होय सर, हा एक आभास होता, जेणेकरून कुणीतरी त्या पोकळीमध्ये जाऊन रहस्य पाहावं... मला इजिप्त आणि आफ्रिकेमध्ये अशा गोष्टींचा अनेक वेळा अनुभव आला आहे... ज्या आत्म्यांची एखादी इच्छा अपूर्ण राहिलेली असते किंवा एखादं मोठं काम अर्धवट राहिलेलं असतं तेव्हा ते कुणाच्या तरी माध्यमातून या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात." अँजेलिना म्हणते.

"तर तुझा या गोष्टींवर विश्वास आहे?" जॉर्डन विचारतो.

"आता जे काही झालं आणि डॉ.अभिजीत जे काही म्हणाले त्याचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून तुम्ही काय निष्कर्ष काढाल?" अँजेलिना त्याला प्रतिप्रश्न करते.

जॉर्डनकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. गप्प होऊन तो आपलं लक्ष दुसरीकडे वळवतो. एकीकडे इम्रान त्या आकृतीचं स्केच काढणं पूर्णत्वाला आलेलं असतं तर दुसरीकडे डॉ.एरिक हे डॉ.अभिजीतच्या हातावर उमटलेल्या भाषेचे फोटो काढू लागतात.

"मला ही एक प्रकारची प्राचीन भाषा वाटत आहे." डॉ.एरिक म्हणतात.

"मला सुद्धा तेच वाटतंय, पण हे सर्व माझ्याच हातावर का? हा प्रश्न मला जास्त सतावतोय. म्हणजे मान्य आहे की मी तिथे आतमध्ये गेलो होतो. पण माझा हेतू कुणा आत्म्याला दुखावण्याचा नव्हता आणि जर या आत्म्यांना आपल्याला काही सांगायचे असेलच तर त्यांनी कुठे दुसरीकडे लिहून सांगावं ना! माझ्या हातावर लिहायची गरजच काय होती?" डॉ.अभिजीत म्हणतो.

"कदाचित तुम्ही त्या आकृतीला हात लावला होता म्हणून तुमच्याच हातावर त्यांनी आपल्यासाठी संदेश पाठवला असावा." डॉ.मार्को त्या दोघांजवळ येत म्हणतात. डॉ.अभिजीतला त्या भाषेचा राग आल्याने हातावर ज्या ठिकाणी ती भाषा उमटली होती त्या ठिकाणी तो थुंकतो. अँजेलिना त्याला ओरडणार तेवढ्यात इम्रानचं स्केच पूर्ण होतं.

"अँजेलिना, स्केच पूर्ण झालं." इम्रान ते स्केच अँजेलिनाच्या हातात देत म्हणतो.

"हे नक्की काय असावं?" अँजेलिना स्वतःशीच विचारते.

"मला हा सी-हॉर्स वाटतोय." डॉ.अभिजीत म्हणतो.

"मला हा एक फना काढलेला साप वाटतोय." डॉ.मार्को म्हणतात.

"डॉ.अभिजीत, तुम्हाला उंच पर्वतावर कुणीतरी असल्यासारखं दिसत होतं. म्हणजे कुठल्यातरी उंच ठिकाणाकडे जाण्यासाठी तो एक इशारा..." अँजेलिना तिचं बोलणं पूर्ण करते ना करते जोरदार वादळ येतं, "ओ...ह... माझं डोकं दु:खू लागलंय..." अँजेलिनाच्या डोक्याला काहीतरी आदळत आणि ती बेशुध्द होते. जोरात बर्फवृष्टी होऊ लागते. जॉर्डनच्या टीमजवळ जे काही होतं ते सर्व भूकंपामध्ये जमिनीखाली गाडल गेल्याने सुरक्षा करण्यासाठी किंवा बर्फापासून वाचण्यासाठी त्यांच्याजवळ काहीही नव्हतं. अँजेलिनानंतर डॉ.मार्को आणि इम्रान देखील बेशुध्द होतात. सगळं एकदम अंधुक होतं आणि काही क्षणानंतर हळू हळू थोडंफार स्पष्ट दिसू लागतं. डॉ.एरिक, डॉ.अभिजीत आणि जॉर्डन शुद्धीवर असल्याने ते बेशुध्द असलेल्या तिघांना उचलू लागतात.

"तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल. इथे तुम्हला धोका आहे." पाठीमागून कुणाचा तरी आवाज येतो. तिघेही मागे फिरून बघतात तर भारतीय लष्कराचे जवान त्यांना वाचवण्यासाठी तिथे आलेले असतात. जॉर्डन होकारार्थी मान हलावतो. लष्कराचे जवान त्या सर्वांना दिल्ली येथे सुखरूप घेऊन जातात. अशक्तपणा आल्यामुळे डॉ.मार्को, इम्रान आणि अँजेलिनाला रुग्णालयात दाखल करण्यात येतं.
(क्रमशः)

No comments:

Post a Comment