लेखकाच्या परवानगीशिवाय कोणताही लेख/ भाग प्रकाशित करू नये. सर्व हक्क राखीव @ अर्थ मराठी.कॉम

भाग ३०

Abhijit Kills Agneeputra like a Warrior 
अग्निसूर्य अँजेलिनाला त्याच गोष्टी करायला सांगतो, ज्या अँजेलिनाला अपेक्षित होत्या. अभिजीत आणि त्याची तलवार सुपर जेटमध्ये एका खास कक्षात सुरक्षित असतात. कक्षाभोवती विशिष्ट तरंग असल्याने अग्निपुत्राला त्यांचा अंदाज बांधता आला नव्हता.

ज्या वेळी उडणारे डायनोसोर आणि अर्धसर्पनुष्यांनी अभिजीतचं विमान समुद्रामध्ये पाडलं होतं, ते मुद्दाम पाडण्यात आलं होतं. मुद्दाम त्याने अग्निपुत्राच्या हल्ल्यांना प्रतिकार करायचं थांबवलं होतं. जेनेकरुन उडणारे डायनोसोर त्यांचं विमान समुद्रात पाडतील. त्याच वेळी अभिजीत आणि त्याचे साथीदार पाणबुडीमधून तिथून फरार झाले होते. हीच तर अभिजीतची योजना होती. त्याला अग्निपुत्राला असं दाखवून द्यायचं होतं मनुष्यप्राण्यासमोर त्याचे पारडे जड आहे, ज्यात अभिजीत यशस्वी झाला होता.

अग्निपुत्राच्या नकळत अग्निसूर्य आणि अँजेलिना काही अर्धसर्पानुष्य सैन्यासोबत सुपर जेट मध्ये जातात. जॉन आणि लिसा तिथेच असतात. अँजेलिना अग्निसूर्याची त्यांच्याशी ओळख करुन देते.

"मला अभिजीतला भेटायच आहे." अग्निसूर्य म्हणतो.

"तो अजुन सुद्धा बेशुद्धावस्थेत आहे. तुम्हाला त्याला भेटता येणार नाही." जॉन म्हणतो.

"सर्व प्रकारचे प्रयत्न करा. काहीही करुन तो जिवंत झाला पाहिजे. तुम्हा सर्वांना अग्निपुत्रापासून मी वाचवु शकतो आणि तुम्ही सगळ्यांनी मला मदत केली तर तुम्हा सर्वांना मी अभय देईन." अग्निसूर्य म्हणतो. अचानक एक दरवाजा उघडला जातो ज्यातून रुद्रस्वामींसारखा वेश घेऊन जॉर्डन त्याच्यासमोर येतो.

"अग्निसूर्या, तुला या पृथ्वीवर राज्य करायचं असेल तर अभिजीत आणि त्याची तलवार आहे त्या अवस्थेत अग्निपुत्रापर्यंत न्यायची आहे. अग्निपुत्र समोर येताच तू त्याचं मस्तक त्याच्या धडापासून वेगळं करायचं आहे. तेव्हाच अभिजीत जिवंत होईल आणि तलवारीच्या सहाय्याने त्याच्या शरीरातून प्राण काढून घेईल. लक्षात ठेव, अग्निपुत्राचा जन्म तुझ्यामुळे झाला आहे, तर त्याच्या मृत्यूमध्ये सुद्धा तुला सामील व्हावे लागेल." एवढं बोलून भस्कन धुर होतो आणि जॉर्डन तिथून पळून जातो. अग्निसूर्याला वाटतं रुद्रस्वामी खरंच आलेले आणि त्याला उपदेश देऊन निघुन गेले.

"तुम्ही सर्वांनी त्यांना पाहील का?" अग्निसुर्य म्हणतो.

"कुणाला?" जॉन विचारतो.

"अरे, रुद्रस्वामी आले होते इथे." अग्निसुर्य म्हणतो.

"नाही तर, आपल्याशिवाय इथे कोणीही नाहिये. तुम्हाला भास झाला असेल." लिसा म्हणते.

'अच्छा! म्हणजे मला भास झाला तर... याचा अर्थ रुद्रस्वामी अग्निपुत्रावर खुश नाहीत. अभिजीतला अग्निपुत्राकडे नेतो, आधी मी अग्निपुत्राचं मस्तक त्याच्या धडापासून वेगळं करेन, त्यानंतर अभिजीत अग्निपुत्राला संपवेल आणि तेव्हाच मी अभिजीतला संपवेल. म्हणजे पृथ्वीवर सर्वशक्तिमान मीच असेन.' अग्निसुर्य मनातल्या मनात म्हणतो.

"अभिजीतला शुद्धिवर यायला किती वेळ आहे?" अग्निसुर्य विचारतो.

"आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. पण तो शुद्धिवर येतच नाहिये. बहुतेक तो मेला असावा." जॉन म्हणतो.

"अरेरेरे... खुप वाईट झालं... एक काम करा, तुम्ही त्याला माझ्याकडे सोपवा... मी त्याला अग्निपुत्रापर्यंत नेतो. तुम्ही त्याला शोधलं असं मी त्याला सांगतो... म्हणजे तो तुम्हाला अभय देईल..." अग्निसुर्य म्हणतो.

"ते सर्व ठीक आहे, पण मला सुद्धा तुमच्याबरोबर यावं लागेल. हा कक्ष मीच नियंत्रित करु शकतो." जॉन म्हणतो.

"एवढंच ना! ठीक आहे, ये तू माझ्यासोबत..." अग्निसूर्य म्हणतो.

सुपर जेट आफ्रिकेच्या दिशेने नेण्यात येतं. तिथे ३ ते४ लाख अर्धसर्पानुष्य सैन्याच्या मधोमध अग्निपुत्र एका मोठ्या सिंहासनावर बसला होता. तिथे एका वृत्तवाहिनीच्या हेलीकॉप्टरमधून अग्निपुत्राची प्रत्येक हालचाल जग बघत होतं. सुपर जेटकडे त्यांचं आणि अग्निपुत्राचं लक्ष जातं. अग्निसूर्याने आपण एका जेटने येत असल्याचं आधीच कळवलं होतं, म्हणून कोणीही त्यावर हल्ला करत नाही. जेट त्यांच्यापासून काही अंतरावर उतरतं आणि त्यातून अग्निसुर्य बाहेर येतो.

"देवा, मी तुमच्या भक्षकाचा भक्षक झालो. अभिजीतशी दोन हात करत असताना मी त्याला संपवून टाकलं. तुम्हाला विश्वास बसावा म्हणून त्याचं प्रेत घेऊन आलोय." जॉन आणि आपल्या सैनिकांना एक मोठा पेटारा बाहेर आणायला सांगत तो अग्निपुत्राला म्हणतो.

अग्निपुत्र त्या पेटाऱ्याकडे जात मृत अभिजीतला पाहून विद्रूपपणे हसू लागतो. पृथ्वीवर अधिराज्य गाजवण्याच्या मोहाने अग्निसुर्य पाठीमागुन अग्निपुत्रावर वार करतो. तलवारीच्या एका वारातच तो अग्निपुत्राच मस्तक त्याच्या शरीरापासून वेगळं करतो. तो पुन्हा जिवंत होण्याआधी अग्निसुर्य मृत अभिजीतकडे जातो आणि त्याला गदागदा हलवू लागतो. पण ते एक मेलेलं शरीर असल्याने त्यातून काही हालचाल होत नाही आणि दुसरीकडे अग्निपुत्र पुन्हा जिवंत होतो.

"गद्दार, माझ्यावर वार करतोस? तेसुद्धा पाठीमागुन? तुझी एवढी हिम्मत?" एवढं बोलून अग्निपुत्र अग्निसूर्याला जागेवरच भस्म करतो. आपल्या देवावर हल्ला झालेला पाहून तिथे असलेलं संपूर्ण अर्धसर्पानुष्य सैन्य अग्निपुत्रावर हल्ला करतं. अग्निपुत्र जास्त मेहनत न घेता त्या सर्वांना भस्म करतो. क्षणातच तिथे अग्निपुत्र, जॉन आणि अभिजीत हे तिघेच जिवंत असतात.

टीव्हीवर संपूर्ण जग हा प्रकार पाहत होता. कुणाला काहीही समजायला मार्ग नव्हता. पण अर्धसर्पानुष्य सेना कमी होत आहे हे पाहून दुःखात देखील सर्वांना आनंद होत होता.

अग्निपुत्र तिरक्या नजरेने अभिजीतकडे बघतो आणि त्या पेटाऱ्यातून त्याची मान पकडून त्याला बाहेर काढतो. रागाने अभिजीतकडे पाहत तो अभिजीतच्या मस्तकाला त्याच्या शरीरापासून वेगळं करतो. एवढंच नाही, तर त्या शरीराला भस्म सुद्धा करतो. अभिजीतला स्वतःच्या हातांनी मारल्याने तो मोठमोठ्याने हसू लागतो. संपूर्ण जगावर काळे ढग येतात. सगळीकडे अंधार होतो, सूर्याची किरणे पृथ्वीवरुन नाहीशी होतात. संपूर्ण जग आपल्या डोळ्यांनी अभिजीतचा मृत्यु बघतं. आता आपला शेवट जवळ आला हे निश्चित समजून सगळे हळहळू लागतात. जॉन मात्र तेवढा शांत असतो.

"अरे भित्र्या, स्वतःला वाचवण्यासाठी बेशुद्ध अभिजीतला संपवून टाकलंस. तुझ्यात हिंमत असती तर तू त्याच्याशी युद्ध करु शकला असतास. पण नाही, तुला भीती होती की तो तुला संपवून टाकेल, आणि म्हणूनच तू त्याला अशा निर्दयतेने संपवलंस." जॉन अग्निपुत्राला म्हणतो.

"कोण आहेस तू? आणि का अशा व्यर्थ गोष्टी करत आहेस? तुमचा वाली तर गेला, आता शेवटच्या घटका मोजण्याशिवाय तुम्हा मनुष्याकडे काय शिल्लक आहे?" अग्निपुत्र म्हणतो.

"अरे माझा शेवट जवळ आला आहे, तरी मी भीत नाहिये. आणि तुला आता मरण नाही, तरी तू मृत्युला भीत आहेस. तुझ्यात जरादेखील हिंमत असेल तर अभिजीत ज्या तलवारीने तुला मारणार होता, ती तलवार मला तुझ्या हृदयात घुसवू दे." जॉन अग्निपुत्राला चिथवत म्हणतो.

"बस्स... बस्स... बस्स... माझा इतका अपमान? माझी हिंमत बघतोस? चल घे ती तलवार आणि माझ्या हृदयाच्या आरपार घाल..." अग्निपुत्र रागाच्या भरात जॉनला त्याच्यावर वार करण्याची परवानगी देतो.
जॉनला तेच हवं असतं. तो लगेच ती तलवार घेतो, आणि अग्निपुत्राच्या हृदयातून आरपार करतो. क्षणात अग्निपुत्राचं शरीर विरघळू लागतं. काळे ढग बाजूला सरुन सूर्याची किरणे पृथ्वीवर पडतात. पृथ्वीवर इतर ठिकाणी असलेले अर्धसर्पानुष्य सैनिक हवेच्या झुळूकाने बारीक कण होऊन वाहून जातात.

"हे कसं शक्य आहे? माझा मृत्यु तुझ्या हातून कसा काय होऊ शकतो?" अग्निपुत्र मरता मरता मोठ्याने ओरडतो.

"देवाने मनुष्याला एक खुप मोठी गोष्ट दिली, ती म्हणजे डोकं, त्याचाच मी वापर केला." असं म्हणत जॉन आपल्या कानाच्या पाठीमागुन काहीतरी काढायला सुरुवात करतो, त्याने मुखवटा घातला होता. तो अभिजीत होता.

"तू ज्याला मारलंस तो एक मृत सैनिक होता, ज्याच्या चेहऱ्याला माझ्या चेहऱ्यासारखं बनवलं होतं आणि तुझा भ्रम व्हावा म्हणून माझ्या शरीरातून थोडं त्याच्या शरीरात टाकलं. बस्स, जरा डोकं तू सुद्धा वपरलं असतंस तर आज माझ्याजागी तू जिवंत असतास. तुला मी नाही, तुझ्या अतिउत्साहाने मारलं आहे." अभिजीत बोलत असताना अग्निपुत्र पूर्णपणे विरघळतो.

आता सगळं संपलं होतं, ब्रूस आणि अनेक सैनिकांच्या मृत्युला अभिजीतने न्याय दिला होता. त्याची योजना यशस्वी ठरली होती. मनुष्यावरचं खुप मोठ्ठं संकट विरघळून त्याच्या समोर पडलेलं दिसत होतं. तलवार देखील अग्निपुत्रासोबतच नष्ट झाली होती. जगभरात आनंदोत्सव साजरा होतो. रुद्रस्वामी निश्चिंत होऊन तिसऱ्या जगात निघून जातात. जॉन, जॉर्डन, अँजेलिना, लिसा, डॉ. मार्को, डॉ.एरिक आणि मोठ्या प्रमाणात अनेक देशांतील सैनिकं अभिजीतला घेण्यासाठी विमानांतून आफ्रिकेच्या दिशेने उड्डाण करतात. कुठूनतरी थंड हवेची झुळूक येते आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. अभिजीत सुद्धा निश्चिंत होऊन आपल्या गुडघ्यांवर बसतो आणि डोळे बंद करुन वर आकाशाकडे बघतो.

- समाप्त -

2 comments: