लेखकाच्या परवानगीशिवाय कोणताही लेख/ भाग प्रकाशित करू नये. सर्व हक्क राखीव @ अर्थ मराठी.कॉम

भाग २

रुद्रस्वामींचा चेहरा जरा चिंतित होतो.

‘‘म्हणजे? आम्ही समजलो नाही. आमच्यापासून तुम्हाला कोणता धोका आहे? माझ्या माहितीप्रमाणे युध्दसंहाराव्यतिरिक्त आमच्या हस्ते तुमच्यापैकी कुणाचाही वध झालेला नाही. आणि राहिला प्रश्न नामशेष होण्याचा, आमच्या मनात तसा विचार देखील आलेला नव्हता.’’

‘‘आम्ही आपल्या विधानाशी पुर्णतः सहमत आहोत. आपण आमच्या संहाराचा विचार देखील मनात आणला नव्हता. मात्र या सृष्टीचा हा नियमच आहे, तुम्हाला तुमचा कूळ वाचवायचा असेल तर ज्याच्यापासून तुम्हाला धोका आहे त्याचा समूळ नाश करा.’’ सुर्वज्ञ दिर्घ श्वास घेतात. रुद्रस्वामी आपल्या अनुयायांना त्यांचे बांधलेले हात सोडायला सांगतात. अनुयायी सुर्वज्ञचे हात सोडतात. एक अनुयायी त्यांच्यासाठी जल घेऊन येतो. रुद्रस्वामी आपल्या विश्वासू अनुयायांबरोबर त्यांच्यासमोर बसलेले असतात. जलप्राशन केल्यानंतर सुर्वज्ञ पुढे बोलू लागतात.

‘‘आपण ज्या भुतलावर आहात त्याला पृथ्वी असे म्हणतात. ही पृथ्वी गेल्या 350 अब्ज वर्षांपासून अस्तित्वात आहे. आधी हा फक्त एक गोळा होता ज्यावर कोणताही जीव नव्हता. पृथ्वीवरील वातावरण अगदी अस्थिर होतं. ऋतू सतत बदलत असायचे. अशातच पृथ्वीवर पाणी निर्माण झालं आणि त्या अनुशंगाने पृथ्वीवर जीवांची निर्मिती सुरु झाली. आधी किटकरुपात असलेले हे जीव कालांतराने पाण्यात पोहू लागले. त्यांचा शारीरिक विकास चांगला झाला तेव्हा पोहणाऱ्या जीवांनी त्या किटकांचा नाश केला. त्यानंतर जलचरांमध्ये वेगवेगळ्याा हवामानानुसार आणि स्थानानुसार आणखी बदल होऊ लागले. काही जलचर पाण्यातच राहू लागले तर काही जमिनीवर आले. त्याच वेळी काही जलचर सरपटू लागले. सरपटणारे जीव आमचे पूर्वज होते. जसजसे शारीरिक बदल होऊ लागले तसतसे आकाशात उडणारे जीव सुध्दा या पृथ्वीवर दिसू लागले. या सर्व कालावधीमध्ये खुप मोठा काळ लोटला गेला. अनेक जाती निर्माण झाल्या आणि लगेच नष्ट झाल्या तर अनेक जातींनी शेवटपर्यंत तग धरला. सर्वांमध्ये इतके बदल होत होते की पृथ्वीवर शेकडो जाती अस्तित्वात आल्या. आल्या आणि आपापल्या अस्तित्वासाठी एकमेकांना संपवू लागल्या. ज्या वाचल्या त्यांनी आपल्या वंशजांना अधिक विकसित करण्याचं कार्य सुरु ठेवलं. आमचे पुर्वज मात्र या सर्वांपासून खुप दूर उत्तरेकडे (आत्ताचे युरोप) होते. मात्र आमच्यापैकी काही जाती मागे राहिल्या असतील असं त्यांना सतत वाटत होतं. तरीही आमच्या पुर्वजांनी बाहेरच्या जगाशी संपर्क पुर्णतः बंद केला आणि आमचे पुर्वज एका वेगळ्याा विश्वात विकसित होत गेले.’’

रुद्रस्वामींच्या अनुयायांना सुर्वज्ञ थापाड्याा वाटत होता. पण, रुद्रस्वामींना त्याच्या बोलण्यावर पुर्ण विश्वास होता.

‘‘इतक्या प्राचिन गोष्टी आपल्या स्मरणास कशा काय?’’ स्वामींच्या एका अनुयायाने प्रश्न उपस्थित केला.

‘‘आपली स्मृती क्षीण झाली असावी असे वाटते. आम्ही सुर्वज्ञ आहोत. अर्धसर्पानुष्य प्रजातीचे राजे. आमच्या पुर्वजांनी येणाऱ्या प्रत्येक पिढीला त्यांचा भुतकाळ न चुकता सांगितला आहे आणि वेळोवेळी त्याचे स्मरण देखील करुन दिले आहे. म्हणूनच तर आमच्या एका हाकेवर संपुर्ण अर्धसर्पानुष्य जातीने मनुष्याचा संहार केला.’’ सुर्वज्ञने त्यांना उत्तर दिले.

‘‘मुळ विषय बाजूला ठेवू नका. माझा तुमच्या बोलण्यावर विश्वास आहे. पुढे काय झाले?’’ रुद्रस्वामींनी आपल्या अनुयायांना शांत केले.

‘‘शेकडो वर्ष उलटली. आमचे पुर्वज बरेच विकसीत झाले होते. त्यांच्यापैकी काहींनी बाहेरच्या जगात जायचे ठरविले. बाहेरच्या जगात आल्यावर त्यांना त्यांच्या डोळ्याांवर विश्वास बसत नव्हता. चार पाय असलेले महाकाय प्राणी, तर काही ठिकाणी दोन पाय आणि दोन हात असलेले देखील काही महाकाय प्राणी पृथ्वीवर दिसून येत होते. चित्रविचित्र चेहरे, त्यांपैकी बरेचसे वनस्पती खात असलेले आम्हाला आढळून आले. आमचे पुर्वज त्यांना डायनोसोर म्हणून संबोधत असे. परंतु त्यांना पृथ्वीवर जास्त तग धरता आला नाही. ऋतुमानात होत असणाऱ्या बदलांमध्ये ते स्वतःचा वर्तमान आणि भविष्य संपवून बसले. तरी त्यांनी खुप मोठा कालावधी पृथ्वीवर वास्तव्य केले.’’

‘‘यामध्ये आमच्या पुर्वजांचा कुठेही उल्लेख दिसत नाही.’’ रुद्रस्वामी म्हणाले.

Human Evolution
‘‘तुमचे पुर्वज खुप उशिरा विकसीत झाले. जेव्हा आमच्या काही पुर्वजांना हात-पाय प्राप्त झाले आणि आम्ही सरपटण्यापासून चालू लागलो त्याच्या हजारएक वर्षांनंतर तुमचा पहिला पुर्वज आमच्या एका पुर्वजाला दिसला. तो माकड होता. गुडघ्यापर्यंत लांब हात आणि पुर्ण अंगावर केस असलेला तुमचा पहिला पुर्वज वाकून चालत असे. त्यांनी त्याच्याकडे जास्त लक्ष दिले नाही. एक साधारण जीव समजून आमच्या पुर्वजाने त्याला सोडून दिले. अनेक वर्ष लोटली. तुमच्या पुर्वजाचा विकास होताना स्पष्टपणे दिसत होता. त्याच्या शरीरावरील केस हळूहळू कमी होत चालले होते. नर हा त्याच्या लिंगावरुन आणि मादी तिच्या स्तनांवरुन ओळखता येत होती. इतर सर्व जीवांच्या तुलनेत तुमच्या पुर्वजांचा विकास खुप कमी कालावधीमध्ये झाला. त्यांनी आपल्या अफाट बुध्दीमत्तेचा वापर करत आपले जीवन सुखी आणि समृध्द केले. आम्हाला कधीही त्यांची भिती वाटली नाही किंवा त्यांच्याकडून धोका वाटला नाही.’’

‘‘जर भिती वाटली नाही किंवा धोका वाटला नाही तर मग तुम्ही आमच्या जातीच्या लोकांच्या हत्या का केल्या?’’ एक अयुयायी तिव्र शब्दांत आपला राग व्यक्त करत होता. रुद्रस्वामी त्याला शांत व्हायला सांगतात.
‘‘भोजनाची व्यवस्था करत असताना आमच्यापैकी एकाने अरण्यात तुमच्या प्रजातीचे लोक वाघाची शिकार करुन जात असताना पाहिले. वाघाने प्रतिकार करुन देखील तुमच्या प्रजातीच्या लोकांनी त्याच्यावर विजय मिळवला. त्याने निरखुन पाहिले असता तिथे त्याला अनेक हिंस्त्र प्राण्यांची शिकार झाल्याचे दिसले. त्याने ती वार्ता लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवली.’’ सुर्वज्ञ आता मोठ्या आवाजात बोलू लागला.

‘‘आमच्यासमोर इतका मोठा इतिहास होता. आमचा वंश तेव्हाच वाढू शकतो जेव्हा आम्ही आमच्यावर येणाऱ्या संकटाचा नाश करु शकू. प्रत्येक वेळी एका जातीने स्वतःचा कूळ वाचवण्यासाठीच दुसऱ्या जातीचा नाशच केला आहे आणि भविष्यात आमच्यावर ही वेळ कधीही येवू शकेल या विचाराने आम्ही तुमचा संहार करायचं ठरवलं...’’ सुर्वज्ञच्या विनाशकारी निर्णयाने रुद्रस्वामी क्रोधीत झाले आणि त्यांनी तलवारीने त्याचं मुंडकं त्याच्या धडापासून वेगळं केलं. सुर्वज्ञ तडफडतच मेला.

सुर्वज्ञचं शरीर नष्ट करायला सांगत रुद्रस्वामी आपल्या दोन अनुयायांसोबत तिथून बाहेर निघतात.

‘‘स्वामी, आता आपण काय करायला हवं?’’ एक अनुयायी विचारतो.

‘‘स्वामी, त्यांच्यासारखे अजून बरेचसे या भुतलावर असतील.’’ दुसरा बोलू लागतो.

‘‘भुतल नाही, पृथ्वी. आपण ज्या भुतलावर राहत आहोत त्याला पृथ्वी असं म्हणतात. सुर्वज्ञ जे काही सांगत होता त्यातील एक आणि एक शब्द खरा आहे. फक्त त्या मूर्खाची निर्णय घेण्याची कुवत नव्हती. त्याच्या या एका चुकीमूळे संपुर्ण अर्धसर्पानुष्य जातीचा नाश होणार आहे.’’ रुद्रस्वामी बोलू लागतात. दोन्ही अनुयायी स्तब्धपणे प्रश्नार्थक नजरेने स्वामींकडे पाहतात. त्यांच्या मनात नक्की काय चाललंय हे स्वामींना लगेच समजतं, ते पुढे बोलू लागतात.

‘‘काळ बदलला आहे... आता नव्या युगाची सुरुवात होणार आहे...’’ आकाशाकडे बघत रुद्रस्वामी पुढे म्हणतात, ‘‘सगळं जितकं सोपं दिसतं त्याहीपेक्षा जास्त गुंतागुंतीच आणि समजण्यास अवघड आहे. आता आपण हिमालयातून स्थलांतर करायला हवं."

स्वामी आपल्या अनुयायांकडे बघतात, "हे जग खुप मोठं आहे, कदाचित यापुढे आपल्यापैकी कुणाचीही भेट होणार नाह़ी़. सर्वांनी जगभर पसरा़. अर्धसर्पानुष्य आणि त्यांच्यासारखे इतर विनाशकारी विपरीत बुध्दी असलेले जीव पृथ्वीवरुन समूळ नष्ट करा. संहार करा त्या सर्वांचा आणि त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे नष्ट करा.’’

‘‘जशी आपली आज्ञा, आम्ही आतापासूनच तयारीला लागतो. पण स्वामी, आपण कुठे स्थलांतरीत व्हाल?’’

‘‘तुम्ही सर्वांनी आपले कार्य अगदी चोखपणे पार पाडा. मी पुर्वेकडे जात आहे.’’

‘‘पुर्वेकडे? पण कशासाठी स्वामी?’’

‘‘कधी वाटलं देखील नव्हतं, अर्धसर्पानुष्यासारखा शत्रु आपल्यासमोर येऊन उभा राहील. हा तर दुबळा होता, पण भविष्यात याहीपेक्षा बलाढ्या शत्रुबरोबर युध्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणूनच मनुष्यजातीचे रक्षण करण्यासाठी ‘अग्निपुत्राला’ आता जन्म घ्यावाच लागेल.’’

‘‘म्हणजे? अग्निपुत्र खरंच जन्म घेणार आहे?’’
(क्रमश:)

1 comment: